Author लेखक

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

माझ्या वेदनेस...

माझ्या वेदनेस नको, 
तुझ्या नयनांचे पाणी...

कोमेजल्या स्मृतींसाठी, 
नको सांत्वनेची गाणी...

निखळत्या ताऱ्याला, 
हवा आधार सावरायला... 

पुरतील दोन शब्द तुझे,
पुन्हा प्रतिभा जागवण्याला... 

माझ्या वेदनेस हवा, 
एक जिव्हाळा राधेचा... 

विष पिण्यापूर्वी मिळावा, 
एक होकार मीरेचा..!


-प्रा. बापू घोक्षे 

अभिशाप...

तुझ्या आठवणीत रात्र जागताना- 
काळोखाचे हुंकार ऐकत
निद्रेच्या याचनेत कूस बदलीत मी...

माझ्यातला मी सोबतीला-
काळोखाची नीरवता जिव्हारी घुमते
ती लय धिक्कारणारी सुन्न...

विषण्ण... सदगदित-
शांततेची किंकाळी ऐकत
जिवंत सरणावर चढतो मी...

मनःचक्षू फुटून वाहणारं रक्त वेचीत-
उन्मत्तांच्या उन्नत परंपरेसारखा धूर्त मी...

धुंद...मदांध...नरपशू आणि-
हिंस्र पिशाच्च कच्चं खाणारं मानवतेला
अभिशाप माणसाला...

- आता मी जागत नाही..!

-प्रा. बापू घोक्षे 

मंगळवार, २८ जून, २०११

गुरुवर्य प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांना...


दरणीय गुरुवर्य
  प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे,
आज आपला ' सुवर्ण महोत्सवी ' वाढदिवस... 
खूप-खूप शुभेच्छा..!
आपण खरे शिक्षक आहात... 
आम्हा विद्यार्थ्यांचे आणि समाजाचेही...
आमच्या जीवनाला चळवळीत आणणारे आपले लेखन...
आंबेडकर समजावून सांगणारी आपली अमोघ वक्तृत्व शैली...
निडर आणि स्वाभिमानाने ओतप्रोत भरलेले 
आपले ज्वालाग्राही विचार...
गुरुवर्य, 
आपण प्रभावित केलंय आमच्या सारख्या अनेकांचे आयुष्य... 
ते तुम्हीच तर आहात गुरुवर्य..!
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
-प्रा. बापू घोक्षे 


मंगळवार, १४ जून, २०११

Malshej Tour.wmv

            
                माळशेज घाटातून आम्ही सफर केली. सोबत आमचे वडील श्री. मल्हारराव घोक्षे गुरुजी, आई सौ.मंदाकिनी घोक्षे आणि भाचा गौरव लांजेवार हे होते. त्या सफारीचा हा व्हिडिओ. - प्रा.बापू घोक्षे. 

* माळशेज सफर 

* संकलन / पार्श्वसंगीत   : प्रिन्स घोक्षे 
* संकल्पना                    : प्रिन्सेस घोक्षे 
* निर्माती                       : प्रा. हेमलता घोक्षे 
* चित्रीकरण / दिग्दर्शन   : प्रा. बापू घोक्षे 
* सौजन्य                       : YouTube.com

रविवार, ८ मे, २०११

माय...

दैनिक ' सकाळ ' ने ' मदर्स डे ' च्या निमित्ताने आईला शुभेच्छा देणारे संदेश पाठवा, असे आवाहन केले होते.  सबंध महाराष्ट्रातून आलेल्या या संदेशांमधून निवड झालेले काही संदेश दि. ०८ मे २०११ च्या ' सकाळ ' च्या अंकात प्रसिद्ध करण्यात येऊन या संदेशांना पुरस्काराने सन्मानितही केले गेले. त्यात प्रा. बापू घोक्षे यांच्या ' माय ' या कवितेला हा सन्मान मिळाला. प्रस्तुत आहे ती कविता... 

१.
माय कायम अस्वस्थ असायची
मनातल्या मनात घरघरायची
खुल्या हसण्यानं तिच्या
दुबळी आसवं टपकायची...
काळजाच्या विवरात
गूढ तरंगांना ढवळीत रहायची...

२. 
खरंच माय-
तू कायम जाणवलीस मला एक अभेद्य रहस्यचक्र..!
निदान आता तरी उलगडत नाहीत
तुझ्या मनःगर्भातील कळा...
बाप कळला...
भाऊ कळला...
बहिण कळली...
बायको कळली...
जगाची समीक्षा केली...
पण माय-
तू माझ्या उमजेच्या बाजूलाही फटकली नाहीस...

३.
माझ्या डोक्यावरून फिरणारा तुझा नितळ स्पर्श
पेटवित गेला माझ्यातले असंख्य क्रांतीचंद्र...
माझ्या मशालीचे लाड तूच पुरवलेस-
तरीही तू किती शितल होतीस..!
वाट चुकायचो तेव्हा तूच धरलंस बोट माझं-
तो काळ...
थरारून टाकणारा...
काळीज चिरीत याद येतो आजही...
तुझ्या पदराच्या सावलीने वास्तवाचे अग्निलोळही
सुसह्य झाले मला...
माझ्यातला अनाम भटक्या माय,
स्थिरावत गेला तुझ्या डोळ्यातल्या स्वप्नांसाठी..!

४. 
माय...
तू साधीभोळी...
तुझ्या अंतर्मनातला अस्वस्थ सूर्य
मी कायम पाहत आलोय...
पण त्याची धग तू मला कधी लागूच दिली नाहीस..!

तू लावलेल्या रोपट्यांना बहार येताना
तू का कोमेजत असतेस ग ?
एकदा हास खळाळून विशाल सागरासारखं...
फेकून दे दूर कोनाड्यात तुझी सगळी घरघर...
फुलू दे तुझं अस्तित्व घरातल्या घरात-
तुझ्या फुलांना सुगंध यावा म्हणून-!
माय...
तुला माझं ऐकावंच लागेल...

- प्रा. बापू घोक्षे 

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

अनुपम, डॉ. ड्यांग होऊ नका...

* ज्ये*ष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या
आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात एका कार्यक्रमाचे आयोजन
केले होते. त्यात फिल्मी दुनियेतील अनेक सिने कलावंत सहभागी झाले होते. त्यात
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर उपस्थित होते.

अनुपम खेर यांचा परिचय आम्ही वेगळा देण्याची गरज नाही.

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आजवर जे - जे महान कलावंत झाले,
त्या महान कलावंतांच्या यादीत अनुपम खेर हे नाव चांगलंच वरच्या यादीत आहे.
त्यांनी केलेल्या बहुरंगी भूमिका आणि त्यांचा कसदार अभिनय प्रेक्षकान्च्या मनात
कायम ठसलेला आहे. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे सामर्थ्य फार कमी
कलावंतांमध्ये असते. ते कौतुक अनुपम खेर यांना लोकांनी भरभरून दिले आहे.
त्यांच्या जागी ते खरोखरच उत्तम अभिनेते आहेत, यात शंकाच नाही. त्यांचा ' मंथन
' मधील पुत्रमृत्यूने शोकविव्हल झालेला म्हातारा काय किंवा ' कर्मा ' मधील
अंगावर शहारे आणणारा डॉ.ड्यांग काय - सगळ्या भूमिका अभिनेता म्हणून लाजबाबच !

या कलावंताने आपले नैपुण्य असलेला अभिनयाचा प्रांत सोडून नको
तिथं घुसखोरीचा प्रयत्न केला आणि विनाकारण टीकेचा विषय होऊन बसला...

...अण्णांच्या संदर्भाने आयोजित मुंबईतील त्या कार्यक्रमात [
शुक्रवार, दि. ०८/०४/११ ] अनुपम खेर यांनी सार्वभौम भारताच्या महान
राज्यघटनेविषयी बरीच गरळ ओकली. ते म्हणाले,
" भारताचे संविधान जुने झाले आहे. ते फेकून देण्याच्या लायकीचे
आहे. आपण रोज चड्डी बदलतो, मग संविधान बदलण्यास काय हरकत आहे ? " *[ संदर्भ :*
*वृत्तरत्न सम्राट** दि.१०/०४/२०११ ].*

राज्यघटनेविषयी अशा प्रकारे बेजबाबदारीचे विधान करण्याची अनुपम
खेर यांची लायकी आहे का ? हा खरा प्रश्न आहे. राज्यघटनेविषयीचा त्यांचा अभ्यास
किती आहे ? ती त्यांनी पूर्ण वाचली तरी आहे का ? त्यांचा वकूब अभिनयात,
राज्यघटनेच्या अभ्यासकात कधी आला ?

बोलण्याचा अधिकार सर्वाना आहे, हे मान्य करूनही अनुपम सारख्या
पब्लिक फिगरने * *असे बेताल वक्तव्य करणे किती योग्य आहे, याचा विचार करणे
आवश्यक होते. केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले आहे, या
जातमुलक विषारी भावनेतून खेर असे बोलले असतील तर ही दुर्दैवाचीच बाब आहे. अनुपम
खेरांचे विधान हे तत्कालीन आवेगातून आले असण्याचीही शक्यता आहे. अण्णांच्या
आंदोलनात सगळा देश सहभागी झाला होता. त्या अभिनिवेशात अनुपम खेर स्वतःवर आणि
भावनांवर नियंत्रण ठेऊ शकले नसावेत. नाहीतरी कलावंत हे संवेदनशील असतात असे आपण
मानतोच की.

अनुपम यांना भ्रष्ट व्यवस्थेविषयीची चीड असावी असे वाटते. तो
राग कोणावर काढायचा हे न समजल्यामुळे ते विष ओकून रिकामे झाले असावेत. आजच्या
या व्यवस्थेला संविधान जबाबदार नसून ते राबविणारे लोक जबाबदार आहेत, ही साधी
बाब त्यांच्या लक्षात आली नाही, एवढे त्यांचे राज्यघटनेविषयीचे अगाध ज्ञान आहे.

* * ही राज्यघटना देशाला बहाल करताना डॉ. बाबासाहेब
आंबेडकरम्हणाले होते,
* * " हे भारतीय संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारे लोक
लायक नसतील तर हे संविधान कुचकामी ठरेल. "
* *
ही राज्यघटना सर्व स्तरातील लोकांची काळजी घ्यायला समर्थ आहे.
तिची तंतोतंत अंमलबजावणी केली तर हा देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.
मात्र ते कसे राबविले जाते ? किती खंबीर लोकांद्वारे राबविले जाते ? याचा
थोडातरी विचार अनुपम यांनी केला आहे, असे दिसत नाही.

कलावंतास जात, धर्म, पंथ हे असं काही नसतं. तो सर्व समाजाचा
असतो. म्हणूनच समाजसुद्धा जाती-पातीच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर प्रेम करीत
असतो. आपल्याला ज्या विषयाचे ज्ञान नाही, त्यात शिरून उगीच बकबक करणे अनुपम
सारख्या तथाकथित 'बुद्धीजीवी' कलावंतास मुळीच शोभले नाही. त्यातही अत्यंत
खालच्या थरावर जाऊन बिभस्तपणे बरळणे निषेधार्हच आहे. हा देशाचा अपमान आहे.
अनुपम खेर यांना हे का समजले नाही ? कोण्या एखाद्या सनातनी राजकीय पक्षाला खुश
करून राजकारणातलं काहीबाही मिळवण्याच्या मोहात तर अनुपमने हा लाळघोटेपणा केला
नसेल ? त्यांनी देशाची माफी मागितलीच पाहिजे.

अनुपम खेर हा ' अनुपम ' कलावंत आहे. त्याची जागा रसिकांच्या
काळजात आहे. तिला त्यांनी बट्टा लाऊन घेऊ नये. कलावंताने कलावंतच राहावे. अनुपम
खेर यांनी ' अनुपम ' कलावंत राहावे, तेच रसिकांना आवडेल. त्यांनी ' डॉ.ड्यांग '
होऊ नये.

-*प्रा.बापू घोक्षे *

रविवार, २७ मार्च, २०११

Rang Barase...

              रंग बरसे....
                 रंग बरसे...
                भिगे चुनरवाली...
                रंग बरसे... 
                - अमिताभ बच्चन यांच्या गायकी नसलेल्या आवाजातही हे गाणं जल्लोष करून जातं. विशेषतः होळीचा रंग खेळत असतांना हे गाणं वाजत असेल तर त्या रंगांच्या खेळाची मजा अधिकच वाढणार.

                रंगांची दुनिया निराळीच.
                माणसाच्या आयुष्यातून रंग काढले तर काय शिल्लक राहील ?  त्याचं जगणं कसं निरस होऊन जाईल... म्हणूनच होळीचा  सण आम्हाला खूप आवडतो. अगदी बालपणापासून या सणाचं आम्हाला खूप आकर्षण वाटतं. त्यामुळे आम्ही आजही मनसोक्त रंग खेळतो. 

                 होळीच्या आदल्या दिवशी एका ' पुरोगामी ' म्हणवणाऱ्या मित्राचा फोन आला.
                 " रंग वगैरे खेळू नकोस. " त्याने आम्हाला दम दिला.
                 " नैसर्गिक रंग खेळतो की... " आम्ही कसबसं उत्तर दिलं.
                 " कसला नैसर्गिक रंग घेऊन बसलास ? "
                 " म्हणजे काय, रंग खेळायचाच नाही की काय ? "
                 " अरे सोडा की त्या परंपरा जरा. बस झाली आता ती संस्कृती..."
                 " रंगांचा आणि संस्कृतीचा काही संबंध आहे, अस मला वाटत नाही. जगातल्या प्रत्येक माणसाला रंगांच्या विविध छटांनी भुरळ घातली आहे. राजा रवी वर्मा जसा रंगांचा वेडा होता तसाच लिओ-नारदो होता. दोघांची संस्कृती भिन्न होती. त्यांना कुठे काय अडचण आली ? "
                 " तुम्ही भारतीयांनी रंग कुठं निर्मळ ठेवलेत ? रंगांच्या मागे धर्म जोडून माणसाला परस्परांपासून विभक्त केलंय..."
                 - आम्ही जरा शांत झालो. नाही म्हटलं तरी त्याच्या बोलण्यात तथ्य होतं.
                 " हे बघ मित्रा, मी नास्तिक माणूस. मला सणांच्या अध्यात्मिक अंगांशी काही घेणं- देणं नसतं. त्यातला आनंदाचा तेवढा भाग मी महत्वाचा मानतो. "
                - मित्रही जरा खाली उतरला.
                " ठिकय बाबा. खेळ तू रंग. तू ऐकणार थोडाच आहेस. पण पूजा-बिजा करू नकोस..." 

                केवळ पूजेला विरोध म्हणून होळी सारख्या रंगीबेरंगी सणावर बंदी घालायची म्हणजे हे जरा जास्तच झालं नाही का ?  सप्तरंगी इंद्रधनुष्यात आपण स्वतः मनमुराद भिजावं... इतरांनाही भिजवावं... त्यातला आनंद अनुभवावा... ती रंगांची जोशपूर्ण उधळण डोळ्यात साठवून ठेवावी... बस बाकी काही नाही. 
                बालपणापासून आम्ही प्रत्येक होळीला हेच करीत आलोत.

                अलीकडे होळीला बरंच विकृत रूप आल्यामुळं बालपणी सारखं रंग उधळीत गावभर हुंदडायला आता नाही जमत. पण खास त्यादिवशी आम्हाला भेटायला घरी येणारे मित्र रंगानी भिजल्याशिवाय  जाऊ शकत नाहीत. मुलांची आणि आमची त्यादिवशी नुसती धमाल असते. मुलं आणि पत्नी सोबत रंग खेळतांना तर मुलांचा अन आमचा एक संघ तयार झालेला असतो. बंगल्याची किंवा पार्किंगची फरशी खराब होऊ नये म्हणून सौ.ची कुरकुर चालत राहते... मग घराच्या बागेत रंगांची सप्तरंगी बरसात सुरु होते... रंगांना कसला आलाय धर्म ? अन कसली आलीय पूजा ?  माणसाला जगण्याचा नवा उत्साह देणारे ते असतात या निसर्गाने दिलेले प्रेरणास्त्रोत...! 
               
                - प्रा. बापू घोक्षे 

गुरुवार, १० मार्च, २०११

Yatana Utsav : Written by Prof.Bapu Ghokshe







यातना उत्सव 


      हा आमचा एकांकिकासंग्रह लवकरच प्रसिद्ध होत आहे... आनंद वाटतोय... ग्रंथ रूपाने प्रकाशित होत असलेला " यातना उत्सव " हा आमचा दुसरा एकांकिकासंग्रह..! 
      या  आधीच्या " फादर " या एकांकीकासंग्रहाचे सर्वत्र प्रचंड स्वागत झाले. अनेक मान - सन्मान - पुरस्कार " फादर " ने मिळवले. फार काय - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानेही त्याला " यशवंतराव चव्हाण वांग्मय पुरस्कार " प्रदान करून गौरविले. 
       " यातना उत्सव " मध्ये  मी लिहिलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या सहा एकांकिका आहेत. ' यातना उत्सव ' या एकांकिकेच्या शिर्षकावरून संपूर्ण संग्रहाला आम्ही तेच नाव दिले आहे. यात ' यातना उत्सव', 'अंजली', 'मगरमिठी', 'मास्टर हिरो', 'आकांत', आणि 'उदाहरणार्थ', या माझ्या काही एकांकिकांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात मराठी रंगभूमीवर सर्वदूर होणाऱ्या एकांकिका स्पर्धांमध्ये या एकांकिकांचे प्रयोग सातत्याने होत  असतात... पुरस्कार विजेत्या ठरत असतात... बहुचर्चित ठरतात... हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच कि काय, तरुण रंगकर्मींमध्ये आमच्या एकांकिका चांगल्याच लोकप्रिय ठरलेल्या आहेत. म्हणून या एकांकिकांना प्रचंड मागणी असल्याचे लक्षात घेऊन या एकांकिका ग्रंथ रूपाने प्रसिद्ध करीत आहोत. हौशी आणि महाविद्यालयाच्या रंगमंचावर सातत्याने धडपड करीत असलेल्या निष्ठावान कलावंताना या संग्रहामुळे चांगल्या एकांकिका सहज उपलब्ध होतील असा आमचा प्रयत्न आहे.
       तशा या एकांकिका प्रयोग करण्यासाठी अवघड आहेत. तथापि, हि आव्हाने नव्या पिढीतील रंगकर्मी पेलवू शकतात, असा मला विश्वास आहे. कारण मी स्वतः  रंगभूमीवर नवखा असताना या एकांकिका उत्तम रीतीने आणि अगदी कसलेल्या कलावंत - दिग्दर्शकांप्रमाणे सादर केल्या आहेत.'यातना उत्सव'  हि एकांकिका तर पाटोद्याच्या एकदम नव्या युवकांनी विद्यापीठाच्या 'केंद्रीय युवक महोत्सवात' लीलया सादर करून विजय नोंदविला आहे. आकाशवाणीने सुद्धा त्या सादर केल्या आहेत. विजय रणदिवे, प्रकाश शेजावळे, प्रशांत तालखेडकर, मनोज प्रकाश, यांच्यासारखे उत्तम दिग्दर्शक या एकांकिकांना लाभले आहेत. मराठवाड्याच्या रंगभूमीवरील दिग्गज कलावंत माधुरी दातार, डॉ.दिलीप घारे, विश्वास साळुंके, संजय लकडे, पुरुषोत्तम खोपातीकर, लक्ष्मीकान्त धोंड, आदींनी या एकांकिकांमध्ये अभिनय केला आहे.
       या एकांकिकासंग्रहाला सुप्रख्यात नाटककार - समिक्षक आणि ८६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा आणखी एक भाग.
        माझे वडील श्री. एम. एस. घोक्षेगुरुजी, आई सौ. मंदाकिनी, माऊ सौ.विमल, ताई सौ.विजयालक्ष्मी लांजेवार, आणि छोटे वकील बंधू बाबासाहेब घोक्षे, माझा सगळा मित्र परिवार, कलावंत, तंत्रज्ञ,  यांचा या एकांकिकांच्या यशात मोठा वाटा आहे. माझी प्रिय पत्नी प्रा.सौ.हेमलता, माझी मुलं चि.संवाद आणि कु.डॉली यांनी माझं नाट्य वेड चांगलंच जपलं आहे. त्यांच्या प्रेरणेशिवाय हे यश अशक्य होतं. 
        "यातना उत्सव " चे स्वागत रसिक चांगले करतील हि खात्री.

    - प्रा.बापू घोक्षे  



संवाद घोक्षे काव्यमैफल

संवाद घोक्षे काव्यमैफल
आमचा मुलगा प्रिन्स संवाद याच्या वाढदिवसाला प्रत्येक वर्षी आम्ही निमंत्रित कवींची भव्य " संवाद घोक्षे काव्यमैफल " आयोजित करतो.

लोकप्रिय पोस्ट