रंग बरसे....
रंग बरसे...
रंग बरसे...
भिगे चुनरवाली...
रंग बरसे...
- अमिताभ बच्चन यांच्या गायकी नसलेल्या आवाजातही हे गाणं जल्लोष करून जातं. विशेषतः होळीचा रंग खेळत असतांना हे गाणं वाजत असेल तर त्या रंगांच्या खेळाची मजा अधिकच वाढणार.
रंगांची दुनिया निराळीच.
माणसाच्या आयुष्यातून रंग काढले तर काय शिल्लक राहील ? त्याचं जगणं कसं निरस होऊन जाईल... म्हणूनच होळीचा सण आम्हाला खूप आवडतो. अगदी बालपणापासून या सणाचं आम्हाला खूप आकर्षण वाटतं. त्यामुळे आम्ही आजही मनसोक्त रंग खेळतो.
होळीच्या आदल्या दिवशी एका ' पुरोगामी ' म्हणवणाऱ्या मित्राचा फोन आला.
" रंग वगैरे खेळू नकोस. " त्याने आम्हाला दम दिला.
" नैसर्गिक रंग खेळतो की... " आम्ही कसबसं उत्तर दिलं.
" कसला नैसर्गिक रंग घेऊन बसलास ? "
" म्हणजे काय, रंग खेळायचाच नाही की काय ? "
" अरे सोडा की त्या परंपरा जरा. बस झाली आता ती संस्कृती..."
" रंगांचा आणि संस्कृतीचा काही संबंध आहे, अस मला वाटत नाही. जगातल्या प्रत्येक माणसाला रंगांच्या विविध छटांनी भुरळ घातली आहे. राजा रवी वर्मा जसा रंगांचा वेडा होता तसाच लिओ-नारदो होता. दोघांची संस्कृती भिन्न होती. त्यांना कुठे काय अडचण आली ? "
" तुम्ही भारतीयांनी रंग कुठं निर्मळ ठेवलेत ? रंगांच्या मागे धर्म जोडून माणसाला परस्परांपासून विभक्त केलंय..."
- आम्ही जरा शांत झालो. नाही म्हटलं तरी त्याच्या बोलण्यात तथ्य होतं.
" हे बघ मित्रा, मी नास्तिक माणूस. मला सणांच्या अध्यात्मिक अंगांशी काही घेणं- देणं नसतं. त्यातला आनंदाचा तेवढा भाग मी महत्वाचा मानतो. "
- मित्रही जरा खाली उतरला.
" ठिकय बाबा. खेळ तू रंग. तू ऐकणार थोडाच आहेस. पण पूजा-बिजा करू नकोस..."
केवळ पूजेला विरोध म्हणून होळी सारख्या रंगीबेरंगी सणावर बंदी घालायची म्हणजे हे जरा जास्तच झालं नाही का ? सप्तरंगी इंद्रधनुष्यात आपण स्वतः मनमुराद भिजावं... इतरांनाही भिजवावं... त्यातला आनंद अनुभवावा... ती रंगांची जोशपूर्ण उधळण डोळ्यात साठवून ठेवावी... बस बाकी काही नाही.
बालपणापासून आम्ही प्रत्येक होळीला हेच करीत आलोत.
अलीकडे होळीला बरंच विकृत रूप आल्यामुळं बालपणी सारखं रंग उधळीत गावभर हुंदडायला आता नाही जमत. पण खास त्यादिवशी आम्हाला भेटायला घरी येणारे मित्र रंगानी भिजल्याशिवाय जाऊ शकत नाहीत. मुलांची आणि आमची त्यादिवशी नुसती धमाल असते. मुलं आणि पत्नी सोबत रंग खेळतांना तर मुलांचा अन आमचा एक संघ तयार झालेला असतो. बंगल्याची किंवा पार्किंगची फरशी खराब होऊ नये म्हणून सौ.ची कुरकुर चालत राहते... मग घराच्या बागेत रंगांची सप्तरंगी बरसात सुरु होते... रंगांना कसला आलाय धर्म ? अन कसली आलीय पूजा ? माणसाला जगण्याचा नवा उत्साह देणारे ते असतात या निसर्गाने दिलेले प्रेरणास्त्रोत...!
- प्रा. बापू घोक्षे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा