यातना उत्सव
हा आमचा एकांकिकासंग्रह लवकरच प्रसिद्ध होत आहे... आनंद वाटतोय... ग्रंथ रूपाने प्रकाशित होत असलेला " यातना उत्सव " हा आमचा दुसरा एकांकिकासंग्रह..!
या आधीच्या " फादर " या एकांकीकासंग्रहाचे सर्वत्र प्रचंड स्वागत झाले. अनेक मान - सन्मान - पुरस्कार " फादर " ने मिळवले. फार काय - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानेही त्याला " यशवंतराव चव्हाण वांग्मय पुरस्कार " प्रदान करून गौरविले.
" यातना उत्सव " मध्ये मी लिहिलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या सहा एकांकिका आहेत. ' यातना उत्सव ' या एकांकिकेच्या शिर्षकावरून संपूर्ण संग्रहाला आम्ही तेच नाव दिले आहे. यात ' यातना उत्सव', 'अंजली', 'मगरमिठी', 'मास्टर हिरो', 'आकांत', आणि 'उदाहरणार्थ', या माझ्या काही एकांकिकांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात मराठी रंगभूमीवर सर्वदूर होणाऱ्या एकांकिका स्पर्धांमध्ये या एकांकिकांचे प्रयोग सातत्याने होत असतात... पुरस्कार विजेत्या ठरत असतात... बहुचर्चित ठरतात... हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच कि काय, तरुण रंगकर्मींमध्ये आमच्या एकांकिका चांगल्याच लोकप्रिय ठरलेल्या आहेत. म्हणून या एकांकिकांना प्रचंड मागणी असल्याचे लक्षात घेऊन या एकांकिका ग्रंथ रूपाने प्रसिद्ध करीत आहोत. हौशी आणि महाविद्यालयाच्या रंगमंचावर सातत्याने धडपड करीत असलेल्या निष्ठावान कलावंताना या संग्रहामुळे चांगल्या एकांकिका सहज उपलब्ध होतील असा आमचा प्रयत्न आहे.
तशा या एकांकिका प्रयोग करण्यासाठी अवघड आहेत. तथापि, हि आव्हाने नव्या पिढीतील रंगकर्मी पेलवू शकतात, असा मला विश्वास आहे. कारण मी स्वतः रंगभूमीवर नवखा असताना या एकांकिका उत्तम रीतीने आणि अगदी कसलेल्या कलावंत - दिग्दर्शकांप्रमाणे सादर केल्या आहेत.'यातना उत्सव' हि एकांकिका तर पाटोद्याच्या एकदम नव्या युवकांनी विद्यापीठाच्या 'केंद्रीय युवक महोत्सवात' लीलया सादर करून विजय नोंदविला आहे. आकाशवाणीने सुद्धा त्या सादर केल्या आहेत. विजय रणदिवे, प्रकाश शेजावळे, प्रशांत तालखेडकर, मनोज प्रकाश, यांच्यासारखे उत्तम दिग्दर्शक या एकांकिकांना लाभले आहेत. मराठवाड्याच्या रंगभूमीवरील दिग्गज कलावंत माधुरी दातार, डॉ.दिलीप घारे, विश्वास साळुंके, संजय लकडे, पुरुषोत्तम खोपातीकर, लक्ष्मीकान्त धोंड, आदींनी या एकांकिकांमध्ये अभिनय केला आहे.
या एकांकिकासंग्रहाला सुप्रख्यात नाटककार - समिक्षक आणि ८६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा आणखी एक भाग.
माझे वडील श्री. एम. एस. घोक्षेगुरुजी, आई सौ. मंदाकिनी, माऊ सौ.विमल, ताई सौ.विजयालक्ष्मी लांजेवार, आणि छोटे वकील बंधू बाबासाहेब घोक्षे, माझा सगळा मित्र परिवार, कलावंत, तंत्रज्ञ, यांचा या एकांकिकांच्या यशात मोठा वाटा आहे. माझी प्रिय पत्नी प्रा.सौ.हेमलता, माझी मुलं चि.संवाद आणि कु.डॉली यांनी माझं नाट्य वेड चांगलंच जपलं आहे. त्यांच्या प्रेरणेशिवाय हे यश अशक्य होतं.
"यातना उत्सव " चे स्वागत रसिक चांगले करतील हि खात्री.
- प्रा.बापू घोक्षे